(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील वांद्री–आंबवली–देवरुख या अरुंद व डोंगराळ मार्गावर रात्रीच्या वेळेस सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तीव्र वळणे, चढ-उतार आणि कमी रुंदी असतानाही ट्रक व डंपरसारखी जड वाहने या मार्गावरून सर्रास धावत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सोमवारी रात्री देवरुखहून आंबवलीमार्गे वांद्रीकडे येणारा एक ट्रक वांद्री गावाजवळील अत्यंत अवघड वळणावर अडकून पडला. या घटनेमुळे काही काळ दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने मोठी वाहतूक कोंडी टळली; मात्र हीच परिस्थिती दिवसा उद्भवली असती, तर संपूर्ण मार्गावर गंभीर अडथळा निर्माण झाला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.
देवरुख–आंबवली–कानरकोंड–वांद्री मार्गे थेट मुंबई–गोवा महामार्ग गाठता येत असल्याने हा मार्ग कमी अंतराचा आणि सोयीचा मानून अनेक अवजड वाहन चालक त्याचा वापर करत आहेत. मोबाईल लोकेशन आणि नकाशांवर आधारित मार्गदर्शनामुळे चालकांना रस्त्याची अरुंदी, तीव्र वळणे आणि धोकादायक चढ-उतार याची कल्पना मिळत नाही. परिणामी अवजड वाहने वारंवार अडकत असून दुचाकी, चारचाकी आणि स्थानिक वाहनधारकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावर अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, रात्रीच्या वेळेस अवजड वाहतुकीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, तसेच योग्य ठिकाणी सूचना फलक, निर्बंध आणि वाहतूक नियंत्रणाची ठोस व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

