(रत्नागिरी / वार्ताहर)
सफाई कामगारांना मालकी हक्काने निवासस्थाने उपलब्ध करून देणे, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती व सायकलचा लाभ देणे, निवृत्ती वेतन वेळेत सुरू करणे तसेच समाजगृह उपलब्ध करून देण्यासह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना प्राधान्याने मिळवून द्यावा. या योजनांची येत्या 3 महिन्यांत अंमलबजावणी करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे बाबतच्या अधिनियम 2013 च्या अंमलबजावणीचा तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव गारवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थित होते.
बैठकीत अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी जिल्ह्यातील सफाई कामगारांची एकूण मंजूर पदे, रिक्त पदे, भरलेली पदे तसेच कंत्राटी आणि नियमित पदांची सविस्तर माहिती घेतली. सफाई कामगारांसंदर्भातील 19 ऑगस्ट 1987, 22 ऑक्टोबर 2008 आणि 1975 च्या लाड पागे शासन निर्णयाबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. सफाई कामगारांच्या वारसांना 30 दिवसांत नियुक्ती देण्याचा शासन निर्णय असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सफाई कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्व विभागांनी मानवतावादी दृष्टिकोनातून काम करावे, असेही डागोर यांनी सांगितले. आयटीआय, विश्वनगर येथील निवासस्थाने सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सफाई कामगारांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करून त्यामध्ये आयुष्यमान कार्डसारख्या सुविधांचा लाभ उपलब्ध करून द्यावा. त्यांच्या मुलांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घ्यावेत तसेच स्वयंरोजगाराच्या योजना राबवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या काळात सफाई कामगारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजासाठी काम केले. आजही त्यांनी सफाईचे काम बंद केले, तर समाजाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, याचा विचार करून त्यांना शासनाचे विविध लाभ प्राधान्याने मिळवून द्यावेत, असे डागोर यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून संपूर्ण जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात येईल, अशी माहिती दिली. यासाठी विविध विभागांची बैठक घेण्यात येणार असून सफाई कर्मचाऱ्यांसाठी शिबिर आयोजित करून त्यांच्या समस्या निश्चितपणे मार्गी लावल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचर पदासाठी तन्वी काशिनाथ कांबळे हिला अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.


