(संगमेश्वर /प्रतिनिधी)
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वरच्या दर्शनासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर निघालेल्या भाविकांना देवरुख-मार्लेश्वर मार्गावरील चिखलाच्या साम्राज्याचा फटका बसला. रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान झालेल्या मातीच्या साच्यामुळे आणि सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी साचलेल्या चिखलात अनेक वाहने रुतल्याने सोमवार रात्रीपासूनच वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र आहे. विजयादशमीच्या दिवशी देवदर्शनासाठी निघालेले भाविक, पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थ रस्त्यात अडकून पडल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
देवरुखहून मार्लेश्वरकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, पावसामुळे कामाच्या ठिकाणची माती रस्त्यावर वाहून आल्याने मार्ग चिखलमय झाला आहे. काही ठिकाणी फूटभर चिखल साचल्याने वाहनांची चाके त्यात रुतत आहेत. परिणामी, वाहनांना पुढे जाणे कठीण झाले असून, प्रवासासाठी निघालेल्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मार्लेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांना मात्र देवदर्शनापूर्वीच रस्त्यावरील या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. वाहनांच्या रांगा आणि चिखलामुळे झालेल्या कोंडीने अनेकांचा प्रवास रखडला. सणाच्या दिवशीच भाविकांची अशी गैरसोय होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दहापर्यंत रस्त्यावरील चिखल हटविण्यासाठी प्रशासनाची अथवा संबंधित ठेकेदाराची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली नव्हती. जेसीबीसारखी यंत्रसामग्री उपलब्ध न झाल्याने अडकलेल्या वाहनांना मार्ग काढणे कठीण झाले. पावसाळी परिस्थिती आणि सुरू असलेल्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली होती का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
रस्ता रुंदीकरणाचे काम करताना पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने चिखल हटवून वाहतूक सुरळीत करावी, तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.


