(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवून सरकारी अनुदानाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी गंभीरपणे घेत राज्य शासनाने आता कंबर कसली आहे. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि शिक्षकांची संचमान्यता यांची एकाचवेळी खातरजमा करण्यासाठी राज्यभर ‘विशेष पट पडताळणी मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही मोहीम कोणतीही पूर्वसूचना न देता राबवली जाणार असून महसूल व शिक्षण विभागाचे संयुक्त पथक शाळांना अचानक भेटी देणार आहे.
या मोहिमेच्या अंमलबजावणीसंदर्भातील आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासणी पथकांची स्थापना करण्यात येणार असून, ही पथके हजेरी पत्रकावर नोंदवलेली विद्यार्थी संख्या आणि वर्गात प्रत्यक्ष उपस्थित असलेले विद्यार्थी यांची जागेवरच पडताळणी करणार आहेत. विद्यार्थी प्रत्यक्षात गैरहजर असतानाही त्यांची हजेरी लावून पटसंख्या फुगवून सांगणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थाचालकांवर या मोहिमेअंतर्गत कडक प्रशासकीय व शिस्तभंगात्मक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पडताळणीपूर्वी मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी स्तरावर तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या जानेवारी महिन्यात शिक्षकांची संचमान्यता व समायोजन प्रक्रिया राबवली जाणार असल्याने, या मोहिमेतून मिळणारी आकडेवारी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
या विशेष तपासणीनंतर शाळांमधील विद्यार्थ्यांची खरी पटसंख्या स्पष्ट होणार आहे. ज्या शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या जास्त आढळेल, तेथील अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन करण्यात येणार आहे. यामुळे शिक्षकांचे समतोल आणि योग्य वाटप साध्य होण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, १५ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा तसेच नववी-दहावीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही अट शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला असला, तरी त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे या विशेष पट पडताळणी मोहिमेत कमी पटसंख्या आढळणाऱ्या शाळांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात असून, शिक्षण क्षेत्रात या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

