(साखरपा / भरत माने)
मिऱ्या नागपूर चौपदरीकरण काम वेगात प्रगतीपथावर आहे.अनेक ठिकाणी पक्का रस्ता देखील पूर्ण झाला आहे. मात्र आंबा घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या साखरपा तळावरून गोवरेवाडीला जाणाऱ्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे.यामुळे या मार्गांवरून वाहतूक करणाऱ्या ग्रामस्थांना समस्याना सामोरे जावे लागत आहे.रस्ता माती व खडीने भरल्यामुळे गाड्या घसरून लहान मोठे अपघात होत आहेत. या मार्गांवरून अनेक विद्यार्थी देखील रोज प्रवास करतात. त्यामुळे त्यांना देखील धोका निर्माण होऊ शकतो. याठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई झाल्याने उभा चढ निर्माण झाला असून एका बाजूला दरी आहे. त्यामुळे येथील परिस्थिती धोकादायक झाली आहे.
त्यामुळे हायवे विभाग, ठेकेदार कंपनी यांनी यावर ताबडतोब कार्यवाही करावी अशी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे.त्याच्याबरोबर साखरपा माजी सरपंच विनायक गोवरे यांनी आक्रमक भूमिका घेत ताबडतोब उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
या आधी पावसाळ्यात या रस्त्याला भेगा पडून धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी देखील हायवे विभाग,ठेकेदार यांच्यावतीने पाहणी करून रस्ता तयार करून देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा धोकादायक रस्ता निर्माण झाला आहे.त्यामुळे हायवे विभाग याकडे गंभीर्याने लक्ष देतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.माजी सरपंच विनायक गोवरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.