(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील निवधे–कळकदरा रस्त्याने आंबाघाटाच्या दिशेने गुरांची अवैध वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी देवरूख पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री रंगेहात पकडली. या कारवाईत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चार बैल आणि बोलेरो वाहनासह तब्बल ₹३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुरांची वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने मोहिम राबविण्यात येत असताना, वाहतूक करणारे व्यक्ती पोलिसांना चकवा देण्यासाठी आता मुख्य महामार्ग टाळून दुर्गम व आडमार्गाचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. देवरूख पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी उशिरा रात्री निवधे–कळकदरा मार्गाने आंबाघाटाच्या दिशेने एक बोलेरो पिकअप जीप गुरांची अवैध वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून तातडीने कारवाई केली.
या कारवाईत अल्ताफ सरदार मुलाणी (वय २६, रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) आणि पांडुरंग कोंडीबा लांबोरे (वय ३२, रा. कांडवन धनगरवाडा, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही धडक कारवाई सपोफौ शांताराम पंदेऱें यांच्या नेतृत्वाखाली पोहेकाॅ सचिन कामेरकर, पोहेकाॅ सचिन पवार, पोहेकाॅ अभिजीत वेलवणकर आणि पोहेकाॅ गणेश सुतार यांनी केली.

