(रत्नागिरी / वार्ताहर)
बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांना अनियमित वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), ईएसआयसी, वेतन पावती आणि वेतनासाठी बँक खात्यासारख्या सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. या कामगारांच्या प्रश्नांवर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयात धडक देत विभागीय अभियंता विजय भांबरे यांना जाब विचारला.
कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसल्याबरोबरच कामगार कायद्यांतर्गत उपलब्ध होणाऱ्या सुविधांचाही लाभ मिळत नसल्याचा मुद्दा मनसेने उपस्थित केला. संबंधित नाशिकस्थित कंत्राटदाराकडून मनमानी केली जात असल्याचा आरोप करत कामगारांवरील अन्याय येत्या १५ दिवसांत दूर करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून कामगारांना कायद्यानुसार मिळणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ द्यावा, अशी स्पष्ट भूमिका मनसेने मांडली. मागण्यांची पूर्तता न झाल्यास स्थानिक मराठी कंत्राटी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी मनसेच्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी बीएसएनएलचे विभागीय अभियंता विजय भांबरे आणि अधिकारी नंदकिशोर कदम यांच्याशी कामगारांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रश्नांवर येत्या १५ दिवसांत सर्वमान्य तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या वेळी मनसेचे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यासह राजू पाचकुडे, रोहन शेलार, चैतन्य शेंडे, सर्वेश जाधव, सुजित घाणेकर आदी मनसे पदाधिकारी तसेच अनेक कंत्राटी कामगार उपस्थित होते.


