(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी शहर व परिसराच्या कायदा-सुव्यवस्थेची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता युवा आयपीएस अधिकारी आरांक्षा यादव यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र केडरच्या २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी यादव यांची रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलामुळे रत्नागिरी पोलीस दलाच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण फेरबदल झाला आहे.
आरांक्षा यादव या यापूर्वी कोल्हापूर येथे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक (ASP U/T) म्हणून कार्यरत होत्या. प्रशिक्षण काळात मिळालेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर आता रत्नागिरी उपविभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालणे, वाहतूक व्यवस्था, कायदा-सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. दरम्यान, रत्नागिरीचे विद्यमान उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांची पालघर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आरांक्षा यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना व बदल्यांच्या प्रक्रियेत यादव यांच्यासह तब्बल १२ अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेची शिफारस करण्यात आली आहे. या फेरबदलातून युवा अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. रत्नागिरी उपविभाग हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून शहरासह ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्था, वाढती वाहतूक, पर्यटन हंगामातील आव्हाने आणि विविध सामाजिक प्रश्नांचा सामना पोलिसांना करावा लागतो. त्यामुळे युवा आयपीएस अधिकारी आरांक्षा यादव यांच्या कार्यपद्धतीकडे आता रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.

