(गणपतीपुळे / वैभव पवार)
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मरत्न गतिमान केले. दोन हजार वर्षांपूर्वी हरवलेले धम्मरत्न बाबासाहेबांना ७० वर्षांपूर्वी गवसले. त्यामुळे हे धम्मरत्न गतिमान ठेवण्यासाठी प्रत्येक बौद्ध अनुयायाने अत्यंत जागृतपणे कटीबद्ध होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बौद्धाचार्य प्रशांत गोपिनाथ जाधव यांनी केले.
रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली बौद्धवाडी येथील नियोजित बुद्धविहाराच्या इमारतीमध्ये बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी आणि संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास धम्मप्रवचन मालिकेतील धम्म प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख धम्मप्रवचनकार म्हणून प्रशांत जाधव बोलत होते. कासारवेली येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १३ येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
‘धम्मरत्न का हरवले, गवसले’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रशांत जाधव यांनी बुद्ध धम्म आणि संघाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘रत्न’ का म्हटले, याबाबत विवेचन केले. बुद्ध, धम्म आणि संघ या तिन्ही बाबी जगातील सर्वश्रेष्ठ व अत्यंत मौल्यवान असून, त्या आत्मसात केल्याने माणसाची खरीखुरी प्रगती होते, असे त्यांनी सांगितले.
भगवान बुद्धांच्या काळानंतर पाचशे वर्षांनी धम्माचा ऱ्हास झाला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मरत्न पुन्हा गतिमान केले. हे धम्मरत्न गतिमान ठेवण्यासाठी प्रत्येक बौद्ध अनुयायाने चुकीच्या गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा अंगीकार कसा करावा, हे त्यांनी विविध उदाहरणे आणि कथांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप व गंध प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कासारवेली गाव शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवर तसेच धम्मबंधू-भगिनींचे स्वागत व सन्मान करण्यात आला. कासारवेली गाव शाखेचे अध्यक्ष मोहन पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेचे उपाध्यक्ष तथा संस्कार समितीचे अध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, तालुका महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, माजी महिला अध्यक्षा तृप्ती कांबळे, महिला मंडळ चिटणीस दिया कांबळे, संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार, दिनकर कांबळे, सुनील गोविंद कांबळे, जयवंत कदम, सतिष कदम, सिद्धार्थ आयरे, सुशील सावंत, मिलिंद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला कासारवेली गाव शाखेतील सभासद बंधू-भगिनींसह तालुक्यातील विविध गाव शाखांचे प्रतिनिधी आणि धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्कार समितीचे अध्यक्ष विजय आयरे यांनी तालुका शाखेच्या कामकाजाबरोबरच वर्षावास धम्मप्रबोधन कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. तालुका शाखेचे प्रबोधनात्मक उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गाव शाखेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
हा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल कासारवेली गाव शाखेचे अध्यक्ष मोहन पवार यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे सचिव रविकांत पवार आणि कासारवेली शाखेचे चिटणीस यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कासारवेली गाव शाखेच्या सर्व सभासद बंधू-भगिनींनी विशेष मेहनत घेतली.


