(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील गोळप (ता. रत्नागिरी) येथे शेतात काम करत असताना झालेल्या सर्पदंशामुळे एका प्रौढ शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नरेंद्र शंकर आंबेकर (वय ५५ / काही सूत्रांनुसार वय ४८, रा. तोरस्करवाडी, गोळप) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील उपचारादरम्यान निष्काळजीपणाचा आरोप केल्याने प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास आंबेकर शेतात नेहमीप्रमाणे काम करत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होताच नातेवाईकांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर आंबेकर यांच्या नातेवाईकांनी आपत्कालीन विभागातील कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. या आरोपांची दखल घेत वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. ही समिती संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करणार असून, त्यातील निष्कर्षांवर आधारित योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे डॉ. रामानंद यांनी स्पष्ट केले.

