(रत्नागिरी / वार्ताहर)
सेवा संकल्प अभियानांतर्गत वालावलकर हॉस्पिटल, डेरवण आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), तालुका रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सॅम-मॅम तसेच दुर्धर आजार असलेल्या बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी DEIC विभाग, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे लड्डू गोपाल योजनेंतर्गत हे शिबिर घेण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुमरे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यातील एकूण ४८ बालकांनी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये ३ सॅम, ४२ मॅम, १ SUW आणि २ इतर आजार असलेल्या बालकांचा समावेश होता. तज्ज्ञ डॉक्टरांनी बालकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले. तसेच बालकांचे वजन वाढण्यास मदत व्हावी यासाठी ४५ बालकांना पौष्टिक लाडूंचे वाटप करण्यात आले. उपस्थित पालकांना आहारतज्ज्ञांनी बालकांसाठी योग्य आहार आणि पोषणाबाबत मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी वालावलकर हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. शर्वरी गमे आणि डॉ. श्रावणी गोसावी तसेच DEIC विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत कांबळे उपस्थित होते. याशिवाय RBSK वैद्यकीय अधिकारी, आरोग्य परिचारिका, औषध निर्माण अधिकारी, DEIC विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ICDS विभागाच्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि पालकवर्ग यांनीही शिबिरात सक्रिय सहभाग घेतला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती रत्नागिरीचे अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित सर्व विभागांचे सहकार्य लाभले. बालकांच्या आरोग्य आणि पोषणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सहभागी अधिकारी, कर्मचारी, तज्ज्ञ, अंगणवाडी सेविका आणि पालकांचे आभार व्यक्त करण्यात आले.


