(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहराच्या विकासात अडथळा ठरत असलेल्या चर्मालय ते कोकणनगर दरम्यानच्या बहुचर्चित अतिक्रमण हटाव मोहिमेला अखेर आज (बुधवारी) सकाळपासून सुरुवात झाली. नगरपालिकेच्या पथकाने जेसीबीसह घटनास्थळी धडक देत रस्त्यालगत उभ्या राहिलेल्या अनधिकृत दुकानांवर आणि पक्क्या बांधकामांवर कारवाई करत सुमारे ९०हून अधिक बांधकामे जमीनदोस्त केली.
शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या या मार्गाच्या दुतर्फा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली होती. परिणामी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात सातत्याने अडथळे निर्माण होत होते. याचबरोबर शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ११ केव्ही क्षमतेच्या भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनीचे कामही अतिक्रमणांमुळे रखडले होते. दरम्यान, ही कारवाई यापूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र सणासुदीचा काळ लक्षात घेऊन प्रशासनाने ती तात्पुरती पुढे ढकलली होती. संबंधित व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवण्यासाठी मुदत मागून घेतली होती; परंतु महिनाभराचा अवधी उलटल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलत थेट कारवाईचा मार्ग अवलंबला.
आज सकाळी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रसामग्रीसह पथक घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही विलंब न लावता सुरू झालेल्या या धडक मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांची मोठी धांदल उडाली.
या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेले ११ केव्ही भूमिगत विद्युत वाहिनीचे काम आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. तसेच, रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेलाही गती मिळणार असल्याने शहराच्या विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

