(पोलादपूर)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ वनविभागाने मोठी कारवाई करत गुजरातमधून चिपळूणकडे अवैधरित्या खैर लाकडाची तस्करी करणारा ट्रक पकडला आहे. विशेष म्हणजे ट्रकला पुढे जाऊन रस्ता दाखवणारा दुचाकीस्वारही या कारवाईत ताब्यात घेण्यात आला असून, वनविभागाच्या महाड पथकाला ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
महाड वनविभागाच्या पथकाला मुंबई–गोवा महामार्गावर MH 12 EQ 9866 क्रमांकाचा ट्रक संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. तपासादरम्यान या ट्रकच्या पुढे MH 03 DQ 6109 क्रमांकाची यामाहा FZ दुचाकी चालवणारा व्यक्ती ट्रकला रस्ता दाखवत असल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाने दोन्ही वाहनांची तपासणी केली असता ट्रकमधून अवैध खैर लाकडाची वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले.
या प्रकरणात मोहम्मद अरसद (रा. गुलशन नगर, हवेली, जि. बलसाड, गुजरात) आणि मोहम्मद उस्मान नुरुद्दीन खान (रा. जनावजी चाळ, खिंडीपाडा, मुलुंड कॉलनी, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत कलम 26(1), 41, 42 आणि 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना महाड न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
वनविभागाच्या माहितीनुसार, ट्रकमधून खैर वृक्षाचे एकूण 201 तुकडे जप्त करण्यात आले असून त्यांचे अंदाजे घनफळ 4.573 घनमीटर आहे. जप्त मालाची किंमत सुमारे 70,18,666 रुपये इतकी असून, या प्रकरणात ट्रक आणि दुचाकी अशी दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई उपवनसंरक्षक रोहा आणि सहाय्यक वनसंरक्षक (जकास व कॅम्प) रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनक्षेत्रपाल आशिष पाटील (महाड), पोलादपूर वनपाल तसेच पोलादपूर तपासणी नाक्यावरील वनरक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
चालक बदलल्याचा संशय
प्राथमिक तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. संबंधित ट्रकचा मूळ चालक गुजरातमधील असून त्याला चिपळूणकडील मार्गाची माहिती नसल्यामुळे पनवेल येथे चालक बदलण्यात आला असावा, असा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे. मात्र हा अवैध खैर नेमका चिपळूणमधील कोणत्या ठिकाणी उतरवण्यात येणार होता, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.

