(रायगड / वृत्तसंस्था)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहूर गाव हद्दीत बुधवारी सकाळी भरधाव ईर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला केबल टाकण्याचे काम करणाऱ्या दोन कामगारांना जोरदार धडक दिली. त्यानंतर कार रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पलटी झाली. या दुर्घटनेत कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
गोव्याहून मुंबई-विरारच्या दिशेने वेगाने जाणारी ईर्टिगा कार (क्र. एमएच ४८ एस ८८१०) बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास वहूर गावाच्या हद्दीत आली. यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर कारने रस्त्याच्या कडेला स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने केबल टाकण्याचे काम करणाऱ्या कामगारांना धडक दिली आणि पुढे शेतात जाऊन पलटी झाली. या अपघातात कार चालक जमील शेख याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात कारमधील आरिफ रईस खान (४९), संतोष सुधाकर पाटील (३०), मोहम्मद आसिफ मोहम्मद हुसेन चौधरी (३०) आणि मोहम्मद रफीक युसूफ झवेरी (५०) हे चार जण, तसेच केबल टाकण्याचे काम करणारे सुनील मंगल सिंग पंधराम (२१) आणि खुन्नू बलहारी सेलू (३४) हे दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
सर्व सहा जखमींना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


