(मुंबई)
प्रसिद्ध चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते पंकज धीर (वय ६८) यांचे आज निधन झाले. बी. आर. चोप्रा यांच्या सुप्रसिद्ध ‘महाभारत’ मालिकेत त्यांनी साकारलेली कर्णाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात अमर आहे. ते गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते.
पंकज धीर यांच्या निधनाने भारतीय टीव्ही आणि चित्रपटसृष्टीने एक प्रभावशाली कलाकार गमावला आहे. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला चार दशकांहून अधिक काळ झाला होता. त्यांनी ‘चंद्रकांता’ मालिकेत ‘शिवदत्त’ ही प्रभावी भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना विशेष भावली होती. तसेच ‘बढो बहू’, ‘युग’, ‘द ग्रेट मराठा’ आणि ‘अजूनी’ यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका देखील गाजल्या.
चित्रपट क्षेत्रातही त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली होती. ‘सोल्जर’, ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘रिश्ते’, ‘अंदाज’, ‘सड़क’ आणि ‘बादशाह’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला.
त्यांचा मुलगा निकितन धीर आणि सून कृतिका सेंगर हे दोघेही प्रसिद्ध कलाकार आहेत.

