( संगमेश्वर /प्रतिनिधी )
दिवाळी म्हटले की, नवीन कपडे, फटाके, रांगोळी, गोडधोड फराळ हे तर आलेच ; पण त्यातही बच्चे कंपनीसाठी औत्सुक्याचा आणि आवडीचा विषय म्हणजे किल्ले बनवणे. परंतु, दिवाळीच्या सुटया आणि अंगणात चिमुकल्यांनी बनवलेले मातीचे किल्ले आता पहायला मिळत नाही. ही संस्कृती नष्ट होऊ लागली आहे. मात्र संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील हृदित मालप या चार वर्षाच्या चिमुकल्याने किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती साकारण्याची किमया केली आहे.
एकीकडे घराघरात आई फराळ बनवायला सुरुवात करते आणि लहान मुलांची किल्ला बनवायची तयारी सुरु होते. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये लहान मुलांच्या परीक्षा संपल्या की लगेच त्यादिवसापासूनच किल्ला कसा बनवायचा? गेल्या वर्षी बनवलेल्या किल्ल्यापेक्षा या किल्ल्यामध्ये नवीन काय बनवता येईल याचे विचार डोक्यामध्ये सुरु असतात. महाराष्ट्राला विविध राजवटींचा इतिहास आहे. यादव काळ, गोंडराजे, छत्रपती शिवाजी महाराज, नागपूरकर राजे भोसले यांच्या प्रगल्भ विचारसरणींतून महाराष्ट्र घडला आहे. हा इतिहास जेवढा रंजक तेवढाच बुद्धिभेद करणारा आहे आणि याची जाणीव महाराष्ट्रात ठिकठिकाणी ३००-४०० वर्षापासून दिमाखाने उभे असलेले गड-दुर्ग-किल्ले बघून होते. इतिहास जाणून घ्यायचा असेल तर या स्थळांना भेटी देणे गरजेचे. त्याच अनुषंगाने इतिहासाला प्रतिकात्मक पद्धतीने उजाळा देण्याचे काम स्थानिक तत्त्वावर युवावर्गासह चिमुकले करीत आहे. युवकांसह चिमुकल्यांनी साकारलेली गड किल्ले आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील हृदित मालप या चिमुकल्याने एक किल्ला तयार केला आहे. हा चार वर्षीय चिमुकला देवरुख येथील अरुणधती अरुण पाध्ये या शाळेत नर्सरीमध्ये शिकत आहे. हृदितने शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने स्वतःच्या कल्पकतेने किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. किल्ल्याची केलेली प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या किल्ल्यामध्ये किल्ल्यावर पहारा देत असलेले सरदार, छत्रपती शिवाजी महाराजांची आसन व्यवस्था, मावळे, घोडे, बुरुज, झेंडे, तोफा यांचे व्यवस्थितपणे मांडणी त्याने केली आहे. हृदितने आपल्या कलाकुसरानी किल्ला सजवलाय ते पाहून त्याचें सर्वत्र कौतुक होत आहे.
मुलांमध्ये वाढत आहे इतिहासाचे आकर्षण
शिवकालीन आणि काल्पनिक किल्ले साकारण्याच्या ओढीमुळे मुले इतिहासातही डोकावायला लागली आहेत. त्या काळातील किल्ल्यांची रचना आणि हेतू शोधण्यासोबतच त्या काळात घडलेल्या घडामोडींचा अभ्यासही आपसूकच व्हायला लागला आहे. त्यामुळे, इतिहासात दडलेला जाज्वल्य पराक्रम मुलांचा डोळ्यांपुढे उभा राहायला लागला आहे.