(रत्नागिरी / वार्ताहर)
काळबादेवी, रत्नागिरी येथील कै. तुकाराम शंकर बनप (वय ८३) यांचे दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे निधन झाले. त्यांनी दि. २९ जानेवारी २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे मरणोत्तर देहदानाचे इच्छापत्र सादर केले होते. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांचे देहदान केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच संशोधनासाठी त्यांच्या देहाचा उपयोग व्हावा, या उदात्त हेतूने हा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हे २४वे देहदान ठरले.
कै. तुकाराम बनप यांनी बसणी येथील जी. एम. शेट्ये हायस्कूलमध्ये मुख्य लिपिक म्हणून काम केले होते. काळबादेवी गावात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. ग्रामस्थांमध्ये एकोपा राहावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आपल्या वाडीतील विविध कार्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. कोणालाही न दुखावता आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी अनेक वर्षे आपल्या वाडीला एकत्रित आणि सामोपचाराने वागण्यासाठी कायम प्रयत्न केले.

आयुष्यभर समाजासाठी कार्यरत राहिलेल्या कै. तुकाराम बनप यांनी मृत्यूनंतरही आपला देह समाजाच्या उपयोगी यावा, या भावनेतून देहदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या परोपकारी आणि निस्वार्थी वृत्तीचे दर्शन त्यांच्या देहदानातूनही घडते, अशी प्रतिक्रिया काळबादेवीतील ज्येष्ठ ग्रामस्थ श्री. अशोक मयेकर यांनी व्यक्त केली.
मरणोत्तर देहदानावेळी कै. तुकाराम बनप यांचे मुलगे मिलिंद, प्रीतम आणि प्रशांत बनप, सुना, नातवंडे, इतर नातेवाईक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव बापू गवाणकर, सदस्य संजय वारेकर, मारुती मयेकर तसेच काळबादेवीतील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण मयेकर, रवी सुर्वे, जयवंत मयेकर, बंड्या पेटकर, विनय मयेकर, विवेक मयेकर, संजय अ. मयेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी उपस्थित राहून कै. बनप यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, कै. तुकाराम बनप यांची नात पायल मिलिंद बनप हिने अलीकडेच बीएचएमएसची अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण करून वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचवेळी तिचे आजोबा कै. तुकाराम बनप यांनी रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मरणोत्तर देहदान केल्याने बनप कुटुंबीयांचे वैद्यकीय क्षेत्राशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ झाले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक श्री. रेशम जाधव तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर लोंढे, श्रेयश जोशी, राज पेडणेकर आणि वाहनचालक प्रीतम भोसले यांनी देहदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी काम पाहिले.


