(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा रेल्वे स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या दुर्लक्षाचे प्रतीक ठरत आहे. या रस्त्यावरील दुभाजकामध्ये वाढलेल्या झाडाझुडपांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित विभागाच्या निष्क्रियतेविषयी नाराजी व्यक्त होत आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकात दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. एसटी, खासगी वाहने, दुचाकी तसेच रिक्षांचा मोठ्या प्रमाणावर वावर असलेला हा रस्ता शहराच्या दळणवळणाचा कणा मानला जातो. सुशोभीकरणाच्या उपक्रमांतर्गत या रस्त्याचे काँक्रीटीकरण करून दुभाजक जांभ्या दगडांनी आकर्षकरीत्या सजविण्यात आले होते. दुभाजकामध्ये शोभिवंत झाडांची लागवडही करण्यात आली आहे. मात्र पावसाळ्यानंतर या झाडांसोबतच रानटी गवत आणि झुडपे मोठ्या प्रमाणावर उगवून वाढली आहेत. काही ठिकाणी ही झुडपे दुभाजकाच्या कडेला ओलांडून रस्त्याकडे झुकू लागली असून त्यामुळे वाहनचालकांची दृश्यता कमी होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या वाढलेल्या झाडांमुळे अपघाताच्या धोक्याची शक्यता आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली उभारलेली रचना देखभालीअभावी विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे. नियोजनबद्ध साफसफाई आणि नियमित देखरेख न झाल्यास आकर्षकतेचा हा प्रयत्न उलट सुरक्षेच्या दृष्टीने अडथळा ठरू शकतो. त्यामुळे दुभाजकातील वाढलेली झाडे आणि झुडपे तातडीने हटवून परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
संबंधित विभागाने या समस्येची दखल घेऊन तात्काळ साफसफाई मोहीम राबवावी, तसेच भविष्यात नियमित देखभालीचे नियोजन करावे, जेणेकरून शहराच्या प्रवेशद्वारासमान असलेला हा मार्ग सुरक्षित आणि सुबक राहील, अशी अपेक्षा नागरिकांसह वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

