(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मुलांनी शिकावे, मोठे व्हावे आणि आपल्या पायावर उभे राहावे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न. मात्र, वाहतुकीची सुविधा अचानक बंद झाल्याने लांजा तालुक्यातील साटवली येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रा. सी. बेर्डे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सध्या दररोज तब्बल सात ते आठ किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे पालकांनी म्हटले आहे. राजापूर-साटवली एसटी बसफेरी तसेच संस्थेची विद्यार्थी वाहतूक करणारी बस (एमएच ०८ एपी ४५३९) बंद झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा पालकांनी केला आहे.
शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूक, मोफत शिक्षण आणि आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. याबाबत साटवली पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या सचिवांकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस तोडगा निघाला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अखेर पालकांनीच प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक कार्यात सक्रिय असलेले पालक योगेश पाजवे हे पायाने दिव्यांग असून, स्वतःच्या शारीरिक अडचणींची पर्वा न करता कुबडीच्या आधाराने मंगळवारी (६ ऑक्टोबर) रत्नागिरीत दाखल झाले. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी त्यांनी विविध शासकीय कार्यालयांत धाव घेतली. त्यांच्यासोबत विद्यार्थी पालक संतोष रजपूत यांनीही पाठपुरावा केला. शारीरिक अडचणी असूनही कुबडीच्या साहाय्याने शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या चढत प्रश्न मांडणाऱ्या पाजवे यांच्या प्रयत्नांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक सुविधेसाठी पालकांना अशा प्रकारे धावपळ करावी लागत असल्याने स्थानिक प्रशासन आणि संस्थेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभागातील माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदने सादर केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून निवेदनाची पोचही घेण्यात आली. उर्वरित संबंधित विभागांकडेही निवेदन देण्यात येणार असल्याचे पालकांनी सांगितले. राजापूर-साटवली एसटी बसफेरी पूर्ववत सुरू होईपर्यंत संस्थेने आणि मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी तातडीने सुरक्षित पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी, अशी प्रमुख मागणी पालकांनी केली आहे. तसेच राजापूर व लांजा आगार प्रमुखांशी समन्वय साधून एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास नाईलाजाने पाल्यांचे शाळा सोडल्याचे दाखले (एलसी) घेऊन त्यांना अन्य शाळेत दाखल करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही पालकांनी निवेदनातून दिला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी प्रशासनाने तसेच संबंधित शिक्षण संस्थेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने तोडगा काढण्याची मागणी पालकांनी केली आहे.


