(गणपतीपुळे / वैभव पवार)
टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या वतीने गावागावांत विशेष क्षयरोग शोध व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य राजेश साळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
जिल्हा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष एक्स-रे मोहिमेत अवघ्या चार दिवसांत एक हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी आणि छातीचे एक्स-रे करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत असलेल्या २० महसुली गावांपैकी ११ गावांमध्ये ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
या मोहिमेत क्षयरोगाची लक्षणे असलेल्या तसेच जोखीम गटातील नागरिकांची तपासणी करून संभाव्य रुग्णांचा शोध घेण्यावर विशेष भर देण्यात आला. गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आरोग्य तपासणी करून घेतल्याने मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावरून श्री. पावसकर आणि श्री. बंदेवाड यांनी विशेष सहकार्य केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
“क्षयरोगाचे वेळेवर निदान आणि उपचार हेच टीबीमुक्त समाजाचे प्रभावी साधन आहे. नागरिकांनी पुढेही अशा आरोग्य उपक्रमांना सहकार्य करावे,” असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.
या मोहिमेमुळे क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून उर्वरित गावांमध्येही लवकरच तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

