(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गूळ-नवसागर मिश्रित कुजक्या रसायनासह दारू निर्मितीचे साहित्य बाळगल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ-कदमवाडी परिसरात कारवाई केली. या कारवाईत सुमारे १ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सुनिल सुरेश आग्रे (वय ३८, रा. आग्रेवाडी, करबुडे, ता. जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शिळ, कदमवाडी येथील नदीकिनारी असलेल्या जंगलमय झाडीझुडपांच्या भागात ही कारवाई करण्यात आली. आग्रे याच्याकडे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी आवश्यक असलेले गूळ-नवसागर मिश्रित कुजके रसायन आणि संबंधित साहित्य आढळून आले. स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदा व विनापरवाना हातभट्टीची दारू तयार करून ती ताब्यात बाळगल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या कारवाईत २०० लिटर क्षमतेच्या एका पत्र्याच्या बॅरलमध्ये सुमारे १०० लिटर गूळ-नवसागर मिश्रित गरम कुजके रसायन आढळले. या बॅरलच्या वरच्या बाजूस अॅल्युमिनियमची डेग बसवण्यात आली होती, तर दारू गाळण्यासाठी प्लास्टिकचा पाईप लावलेला असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
तसेच २०० लिटर क्षमतेच्या १५ पत्र्याच्या व प्लास्टिकच्या बॅरलमध्ये सुमारे २८०० लिटर गूळ-नवसागर मिश्रित कुजके रसायन आढळून आले. याशिवाय आठ प्लास्टिक कॅनमध्ये सुमारे १६० लिटर मिश्रित रसायन, तर दोन प्लास्टिक कॅनमध्ये सुमारे ४० लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. दारू निर्मितीसाठी वापरली जाणारी अॅल्युमिनियमची डेग, लाकडी चाट तसेच इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ९२ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अमिता संदीप पाटील यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सुनिल आग्रे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (ब), (क), (ड), (फ) आणि (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


