(रत्नागिरी /प्रतिनिधी)
फिश मिलसाठी विकल्या जाणाऱ्या छोट्या मासळीच्या दरात अवघ्या आठवडाभरात तब्बल ७०० रुपयांची घसरण झाल्याने मच्छीमारांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. ३२ किलोच्या एका टबला सुरुवातीला १ हजार ८०० रुपये मिळत असताना हा दर अचानक १ हजार १०० रुपयांपर्यंत खाली आल्याचा दावा करण्यात येत आहे. दर निश्चित करण्याबाबत खासदार नारायण राणे यांनी फिश मिल कंपन्यांना सूचना करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने भाजप अल्पसंख्याक सेलचे राज्य उपाध्यक्ष तथा मच्छीमार नेते अब्दुल बिजली खान यांनी कंपन्यांना पत्र पाठवून दरकपातीबाबत जाब विचारला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर खासदार नारायण राणे यांनी शासकीय विश्रामगृहात रत्नागिरीतील फिश मिल कंपन्यांच्या मालकांची बैठक घेतली होती. छोट्या मासळीला योग्य दर मिळावा, यासाठी दर निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. दर ठरविताना अब्दुल बिजली खान यांच्याशी चर्चा करावी, असेही त्यांनी कंपन्यांना सांगितल्याचे खान यांनी नमूद केले. मात्र, बैठकीनंतर आठवडा उलटूनही कंपन्यांकडून दराबाबत कोणतीही ठोस भूमिका अथवा प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काळात चांगल्या प्रतीची मासळी तुलनेने कमी असली, तरी फिश मिलसाठी वापरली जाणारी छोटी मासळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत होती. त्यामुळे ३२ किलोच्या टबला १ हजार ८०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र, त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत हा दर १ हजार १०० रुपयांपर्यंत खाली आल्याने मच्छीमारांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरकपातीचा मुद्दा खान यांनी खासदार नारायण राणे तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून देत मच्छीमारांना योग्य दर मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर खासदार राणे यांनी रत्नागिरीतील चार फिश मिल कंपन्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले. मात्र, त्यानंतरही दराबाबत निर्णय न झाल्याने खान यांनी आता थेट कंपन्यांना पत्र पाठविले आहे.
दरम्यान, मुंबई-तळोजा आणि कर्नाटकातील फिश मिल कंपन्यांकडून मिळणाऱ्या दराच्या तुलनेत रत्नागिरीतील मच्छीमारांना २०० ते २५० रुपये कमी दर का दिला जातो? असा सवाल खान यांनी उपस्थित केला आहे. मासळीचा दर ठरविताना मच्छीमारांचा उत्पादन खर्च, इंधनाचा वाढता खर्च आणि समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती यांचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मच्छीमारांच्या उपजीविकेचा मोठा आधार असलेल्या छोट्या मासळीच्या दरात अचानक झालेली घसरण नेमकी कशामुळे झाली, कंपन्यांनी दरकपातीचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला आणि अन्य बाजारपेठांच्या तुलनेत रत्नागिरीत कमी दर देण्याचे कारण काय, या प्रश्नांची उत्तरे आता मच्छीमारांकडून मागितली जात आहेत.


