(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी केवळ ज्ञान देणारा घटक नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारा आदर्श असतो. शिक्षकांच्या बोलण्या-वागण्यातून विद्यार्थ्यांवर कळत-नकळत संस्कार होत असतात. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःमधील कमतरता प्रामाणिकपणे ओळखून त्यावर काम करावे आणि अधिक परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरू असलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणादरम्यान त्या शिक्षकांशी संवाद साधत होत्या. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) प्राचार्य डॉ. सुशीलकुमार शिवलकर, अधिव्याख्याते राहुल बर्वे, राजेंद्र लठ्ठे आणि शिक्षण विभागातील जगदाळे उपस्थित होते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राज्यभरात शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांच्या माध्यमातून पटवर्धन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे हे प्रशिक्षण सुरू आहे.
शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता स्वतःच्या ज्ञानकक्षा विस्तारण्यावर भर द्यावा, असे आवाहन रानडे यांनी केले. अनेक शिक्षक नावीन्यपूर्ण आणि उपक्रमशील पद्धतीने काम करतात. त्यांच्या या उपक्रमांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचेल, याचा विचार होणे आवश्यक आहे. काही शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मर्यादा असू शकतात. मात्र, त्या दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करावेत. प्रशिक्षणातून अधिकाधिक नवे ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्याची भूमिका प्रत्येक शिक्षकाने ठेवावी, असे त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील बदल, नव्या संकल्पना आणि वर्तमानातील घडामोडी यांची शिक्षकांनी सतत माहिती घेतली पाहिजे. पाठ्यपुस्तकातील ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना त्यापलीकडे जाऊन काय देता येईल, याचे आत्मपरीक्षण प्रत्येक शिक्षकाने करावे, असेही रानडे यांनी नमूद केले.
या प्रशिक्षणात प्रा. प्रभात कोकजे, प्रा. मानसी गानू, प्रा. सागर पोकळे, एस. एस. पडवेकर, एम. बी. बापट, ए. जे. काणे, एस. व्ही. चिले आणि एस. आर. बोडेकर यांच्यासह अन्य प्रशिक्षक मार्गदर्शन करीत आहेत. प्रशिक्षणाला प्रा. राहुल यादव, प्रा. सुयोग तांबे, ओंकार नामजोशी, महादेव शिंदे, प्रा. प्रशांत मेश्राम, प्रा. ओंकार प्रसादे, प्रा. अमोल धुलप, प्रा. सचिन टेकाळे, प्रा. अभिजित गुरव, आरती रानडे, विनया दातार, प्रा. सुशांत मोहिते, एन. एस. बांदार आणि प्रा. दत्तप्रसाद सिनकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. बी. बापट यांनी केले.


