(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदर परिसरात मासेमारी बोटीवर काम करणाऱ्या एका नेपाळी खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नबीन मंजुरे सौद (रा. कैलाली, नेपाळ) असे मृत खलाशाचे नाव असून, त्याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी पांढरा समुद्र परिसरातील पाण्यात तरंगताना आढळून आला. या घटनेने बंदर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नबीन हा मिरकरवाडा येथील मोहम्मद हनीफ मक्सद सोलकर यांच्या मालकीच्या मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून कार्यरत होता. २५ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बोट मासेमारी करून बंदरात परतल्यानंतर मासळी उतरविण्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर नबीन नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत बोटीवरून उतरून बाहेर गेला होता. रात्री दहाच्या सुमारास तो पुन्हा बोटीवर आला; मात्र काही वेळातच नशेत पुन्हा बाहेर पडला. त्यानंतर तो परत न आल्याने सहकाऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला; परंतु तो सापडला नाही.
दरम्यान, २८ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पांढरा समुद्र परिसरात पाण्याच्या प्रवाहात एक मृतदेह तरंगताना स्थानिकांच्या निदर्शनास आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणीअंती हा मृतदेह बेपत्ता खलाशी नबीन सौद याचाच असल्याचे निष्पन्न झाले. अतिमद्यप्राशनामुळे तो समुद्राच्या पाण्यात पडून बुडाल्याची शक्यता प्राथमिक तपासात व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

