(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छतागृह शोधण्यासाठी करावी लागणारी धावपळ आता थांबणार आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतच स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही सुविधा सुरू झाल्यानंतर रुग्णांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख शासकीय रुग्णालय म्हणून जिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण, नातेवाईक आणि नागरिकांची ये-जा असते. मात्र, सध्या असलेले स्वच्छतागृह सिटी स्कॅन विभागाच्या एका बाजूला असल्याने ते सहजपणे नजरेस पडत नाही. परिणामी, रुग्णालयात आल्यानंतर ‘स्वच्छतागृह कुठे आहे?’ अशी विचारणा करण्याची वेळ अनेकांवर येते. या सुविधेपर्यंत पोहोचताना ज्येष्ठ नागरिक आणि प्रकृती असलेल्या रुग्णांना अधिक त्रास सहन करावा लागत होता. मुख्य इमारतीपासून काही अंतर पायी चालल्यानंतर पायऱ्या चढून स्वच्छतागृहापर्यंत जावे लागत असल्याने वृद्ध आणि अशक्त रुग्णांची विशेष गैरसोय होत होती.
रुग्णालयातील या अडचणींची दखल घेत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सांगवीकर यांनी मुख्य इमारतीतच स्वच्छतागृह सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आवश्यक कामाला सुरुवात झाली असून, काम पूर्ण झाल्यानंतर मुख्य इमारतीत येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना जवळच स्वच्छतागृह उपलब्ध होणार आहे. मुख्य इमारतीत ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच हालचालींमध्ये अडचण असलेल्या रुग्णांची गैरसोय कमी होणार आहे. रुग्णालयाच्या दैनंदिन वापराच्या ठिकाणीच ही सुविधा उपलब्ध होत असल्याने तिचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होण्याची अपेक्षा आहे.
सुविधा टिकविण्याची जबाबदारी नागरिकांचीही
नवीन स्वच्छतागृह सुरू झाल्यानंतर त्याची नियमित स्वच्छता आणि देखभाल करणे प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर उपलब्ध सुविधेचा योग्य वापर करून स्वच्छता राखण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह अस्वच्छ होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतल्यास रुग्णालयातील स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण राखण्यास मदत होणार आहे.

