(मुंबई)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स डॅमेज झाल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, या प्रकरणावर आता कुटुंबातील सदस्याकडून पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया समोर आली आहे. जय पवार यांनी “इन्स्टाग्राम स्टोरी” शेअर करत ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत, असे स्पष्ट मत मांडले आहे.
जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील जनतेला या हृदयद्रावक दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. तसेच संबंधित VSR विमान कंपनीला तात्काळ उड्डाणे चालवण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराची सखोल व निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
कुटुंबातील पहिलीच उघड प्रतिक्रिया
अजित पवार यांच्या अपघातावर जय पवार यांनी व्यक्त केलेली भूमिका ही कुटुंबातील व्यक्तीकडून आलेली पहिली जाहीर प्रतिक्रिया आहे. याआधी या प्रकरणावर सातत्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्या रोहित पवार यांच्या भूमिकेशी जय पवार यांची भूमिका साधर्म्य आहे. महाराष्ट्रातील जनतेला या दुर्दैवी घटनेचं खरं कारण समजण्याचा पूर्ण अधिकार असल्याचंही जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे. तसंच, “डीआरएसला तात्काळ VSR कंपनीची उड्डाणं चालवण्यास बंदी घालून, विमानांच्या देखभालीतील संभाव्य गंभीर त्रुटींवर सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही जय पवार यांनी केली आहे. “Miss you Dad” असं भावनिक शब्द लिहित त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
राष्ट्रवादीकडून CBI चौकशीची मागणी
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. राष्ट्रवादीने अजित पवार यांच्या विमान अपघाताची CBI मार्फत चौकशी करण्याची अधिकृत मागणी केली आहे.
VSR वर गंभीर आरोप
रोहित पवार यांनी आतापर्यंत घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये VSR विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. DGCA कडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच VSR कंपनीचे काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा दावा करत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांना पदावरून हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. रोहित पवार यांनी अजित पवार यांना देण्यात आलेल्या विमानाच्या इंजिनमध्ये आधीपासूनच बिघाड असल्याचा गंभीर दावाही केला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता संशयाची धार आणखी तीव्र होत आहे. अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अपघातामागे घातपात झाला का यासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ही या प्रकरणावरील त्यांची दुसरी पत्रकार परिषद असून, पायलट, ब्लॅक बॉक्स, इंधन साठा आणि VSR विमान कंपनीबाबत नवे दावे त्यांनी मांडले. रोहित पवार म्हणाले की, या अपघातातील काही बाबी अजूनही अनुत्तरित आहेत. त्यामुळे घातपाताचा संशय अधिक गडद होत असून, संपूर्ण आणि पारदर्शक चौकशीची गरज आहे.
पायलट, इंधन आणि ब्लॅक बॉक्सवर थेट प्रश्न
पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी विमानाचे पायलट सुमित कपूर यांच्याबाबत थेट सवाल उपस्थित केले. पायलटला कुणी ब्लॅकमेल केले होते का, पायलटच्या मदतीने घातपात घडवून आणण्यात आला का, किंवा विमान जाणीवपूर्वक आदळवले गेले का, असे प्रश्न त्यांनी विचारले.
ब्लॅक बॉक्सबाबतही त्यांनी शंका व्यक्त करत सांगितले की, स्फोटानंतर लागलेला आगपेट इतका मोठा नव्हता की ज्यामुळे ब्लॅक बॉक्स जळून नष्ट होईल. शिवाय, ब्लॅक बॉक्स असलेला भाग सुरक्षित होता आणि तिथल्या तांब्याच्या वायर जळालेल्या नव्हत्या, असा दावा त्यांनी केला.
रोहित पवारांचे प्रमुख सवाल
- पायलटनं जाणीवपूर्वक अपघात घडवून आणला का?
- पायलटच्या माध्यमातून घातपात करण्यात आला का?
- पायलट सुमित कपूरला कुणी ब्लॅकमेल केलं होतं का?
- विमानात इंधन पूर्ण भरण्याची गरज काय होती?
- अतिरिक्त इंधन साठा मुद्दाम भरला होता का?
- स्फोटानंतरचा “आगपेट” ब्लॅक बॉक्स नष्ट करेल इतका तीव्र नव्हता
- ब्लॅक बॉक्सचा भाग सुरक्षित असताना तपासणीवर प्रश्नचिन्ह
- विमानाची 35 कोटींना खरेदी, सध्याची किंमत 10 कोटी; तरीही 50 कोटींचं दाखवलेलं मूल्य
- अपघातात मृत्यू झाल्यास 210 कोटींचा विमा
- विम्याबाबत पायलटला माहिती होती का?
- VSR कंपनीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का?
- सत्तेतील अनेकांची VSR शी जवळीक असल्याचा आरोप
- DGCA मधील वरिष्ठ अधिकारी श्वेता सिंह यांच्याबाबतही गंभीर आरोप
पारदर्शक चौकशीची मागणी
रोहित पवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, हा प्रश्न राजकीय नसून विमान सुरक्षेचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे. ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी देशात अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध असताना तो बाहेर का पाठवला, यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला.
Ajit Pawar plane accident, Black Box controversy, VSR aircraft, CBI inquiry demand या मुद्द्यांमुळे हे प्रकरण राज्याच्या राजकारणासह विमान सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील बनले असून, आता केंद्र व राज्य सरकार पुढे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

