(नवी दिल्ली)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 12वी बोर्ड परीक्षेसाठी यंदा मोठा तांत्रिक बदल जाहीर केला आहे. 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका यावेळी ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) सिस्टीमद्वारे डिजिटल पद्धतीने तपासल्या जाणार आहेत. CBSE 12वी बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 10 एप्रिल दरम्यान होणार असून मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता, वेग आणि अचूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या नव्या पद्धतीनुसार विद्यार्थी परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन देतील आणि उत्तरपत्रिकेत हातानेच उत्तरे लिहितील. विषयानुसार 40, 32 किंवा 20 पानांच्या उत्तरपत्रिकांचा वापर केला जाईल. मात्र परीक्षा संपल्यानंतर प्रत्येक उत्तरपत्रिकेचे प्रत्येक पान परीक्षा केंद्रावरच स्कॅन करून संगणक प्रणालीमध्ये अपलोड केले जाईल. अंदाजे 1 कोटी उत्तरपत्रिका आणि जवळपास 32 कोटी पानांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. प्रत्येक उत्तरपत्रिकेला एक अद्वितीय कोड दिला जाईल, त्यामुळे मूल्यांकनावेळी विद्यार्थ्याचे नाव किंवा रोल नंबर परीक्षकाला दिसणार नाही. यामुळे पक्षपाताची शक्यता पूर्णपणे कमी होईल.
शिक्षक त्यांच्या शाळेतील संगणक प्रयोगशाळेतूनच ओएसिस आयडी वापरून OSM पोर्टलवर लॉगइन करतील. त्यांना त्या दिवशी तपासायच्या उत्तरपत्रिकांची माहिती सिस्टीमवर दिसेल. विद्यार्थ्यांच्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकांची पृष्ठे स्क्रीनवर उघडतील आणि प्रत्येक प्रश्नासाठी स्वतंत्र गुण नोंदवण्याची सोय असेल. शिक्षकांनी दिलेले गुण सिस्टीममध्ये आपोआप सेव्ह होतील. उत्तरपत्रिका पूर्ण तपासल्यानंतर गुणांची बेरीज-वजाबाकी करण्याची गरज भासणार नाही, कारण एकूण गुण आपोआप मोजले जातील. यामुळे गणितातील चुका होण्याची शक्यता संपुष्टात येईल.
काही उत्तरपत्रिका मॉडरेशनसाठी किंवा पुनर्तपासणीसाठी वरिष्ठ परीक्षकांकडे पाठवल्या जाऊ शकतात. कोणत्या शिक्षकाने किती वेळात आणि कसे मूल्यांकन केले याचा संपूर्ण डिजिटल ट्रॅक रेकॉर्ड सिस्टीममध्ये उपलब्ध राहील. अंतिम गुण थेट CBSE च्या निकाल डेटाबेसमध्ये नोंदवले जातील, त्यामुळे मॅन्युअल एंट्री किंवा गुण हस्तांतरणाची गरज राहणार नाही. परिणामी निकाल निश्चित वेळेत आणि कमी वादांसह जाहीर करण्यास मदत होणार आहे.
CBSE 10वी बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिका मात्र यापूर्वीप्रमाणे कागदावरच तपासल्या जाणार आहेत. डिजिटल मूल्यांकनासाठी सर्व 32 हजार शाळांना संगणक प्रयोगशाळा, नवीनतम इंटरनेट ब्राउझर, अॅडोब रीडर, किमान 2 Mbps स्थिर इंटरनेट गती आणि अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व ओएसिस आयडी असलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असून अनेक ‘ड्राय रन’ चाचण्या घेतल्या जातील. समस्या निवारणासाठी कॉल सेंटर आणि मार्गदर्शक व्हिडिओही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
CBSE चा हा निर्णय बोर्ड परीक्षांच्या मूल्यांकन प्रक्रियेत मोठा डिजिटल बदल मानला जात असून यामुळे पारदर्शक, जलद आणि चुकाविरहित निकाल जाहीर करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

