(बारामती)
राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी आणि कर्तबगार नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पार्थिवावर आज (गुरुवारी) बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला होता.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. अजित पवार यांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी मंत्राग्नि दिला. अंत्यदर्शनासाठी बारामतीसह राज्याच्या विविध भागांतून प्रचंड जनसागर लोटला होता.

या अंत्यसंस्कार सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह राज्य व देशातील विविध पक्षांचे नेते, मंत्री, खासदार, आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवार कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करत सर्व मान्यवरांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला.
अजित पवार हे कठोर निर्णयक्षमतेसाठी, प्रशासकीय पकड आणि सामान्यांसाठी धावून जाणाऱ्या नेतृत्वासाठी ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ‘दादा’ या शब्दाला अर्थ देणारे नेतृत्व आज हरपले, अशी भावना कार्यकर्त्यांसह जनसामान्यांमध्ये व्यक्त होत होती.
विद्या प्रतिष्ठान परिसरात ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणा ऐकू येत होत्या. समर्थक, कार्यकर्ते, महिला आणि नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू होते. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने शोकसागरात बुडाला असून, एका राजकीय पर्वाचा दुर्दैवी अंत झाल्याची भावना सर्वत्र दिसून येत होती.
अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर पार्थ आणि जय पवार यांनी हात जोडून जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली

