(मुंबई / वृत्तसंस्था)
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने 2 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशातील ‘तपासात पुरेसा आधार मिळेपर्यंत कोणालाही आरोपी मानले जाऊ नये’ या निरीक्षणावरून आता नवा पेच निर्माण झाला आहे. या निरीक्षणामुळे संभ्रम निर्माण होत असल्याचा दावा करत दिशा सालियन यांचे वडील सतिश सालियन यांनी संबंधित टिप्पणी हटवण्याची किंवा स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. त्यांचे वकील निलेश ओझा यांनी औपचारिक आरोप झालेल्या व्यक्तीला आरोपी संबोधण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात स्पष्टता असल्याचे म्हटले आहे. या निरीक्षणाचा गैरवापर होत असल्याचाही दावा याचिकेत करण्यात आला आहे. या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून रितसर गुन्हा नोंदवून सर्व संबंधित बाबींचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करून सतिश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासह आवश्यक कागदपत्रे आणि वस्तू मालवणी पोलिसांकडून सीबीआयकडे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तपासात गुन्हा सिद्ध झाल्यास योग्य अहवाल, तर गुन्हा घडला नसल्यास समरी सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिशाच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. मृतदेहावरील कपड्यांबाबत पंचनाम्यातील उल्लेख, शरीरावरील जखमा आणि रुग्णालयातील छायाचित्र यासंदर्भात न्यायालयाने सरकारी वकिलांकडून स्पष्टीकरण मागितले. मात्र, या टप्प्यावर कोणताही निष्कर्ष काढायचा नसून प्रकरणात संशय घेण्यासारखे काही आहे का, याचा तपास होणे महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
सतिश सालियन यांनी आपल्या याचिकेत दिशाचा मृत्यू आत्महत्या नसून सामूहिक बलात्कार आणि हत्या असल्याचा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात पुरावे, न्यायवैद्यक अहवाल आणि शवविच्छेदन अहवालाबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि सीडीआरच्या तपासाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डिनो मोरिया, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांबाबतही विविध आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप याचिकेतील दावे असून, त्यावर न्यायालयाने कोणताही निष्कर्ष नोंदवलेला नाही.
याचिकेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संबंधित व्यक्तींच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तसेच आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग व लाय डिटेक्टर चाचणी करावी, विशेष सरकारी वकील नियुक्त करावा आणि एनआयए किंवा सीबीआयमार्फत न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सतिश सालियन यांच्या नव्या मागणीवर लवकरच सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.


