(पुणे / वृत्तसंस्था)
पतीचे दिव्यांगत्व, कुटुंबावर असलेले कर्ज आणि घराची संपूर्ण जबाबदारी पार पाडण्यासाठी परदेशात नोकरी करण्याचा निर्णय घेतलेल्या एका महिलेला दुबईत भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागले. हॉटेलमध्ये नोकरी आणि दरमहा सव्वा लाख रुपये पगार देण्याचे आमिष दाखवून स्थानिक एजंटने तिला दुबईला पाठवले होते. मात्र, तेथे पोहोचल्यानंतर तिच्यावर देहविक्रीसाठी दबाव आणण्यात आला. तिने विरोध केल्यानंतर पासपोर्ट हिसकावून घेत तिला खोलीत डांबण्यात आले आणि सुटकेसाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. अखेर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या मदतीने केलेल्या प्रयत्नांमुळे या महिलेची सुटका झाली असून, ती सुखरूप भारतात परतली आहे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महिलेने परदेशात नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती. याचदरम्यान व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तिचा एका एजंटशी संपर्क झाला. त्याने दुबईतील हॉटेलमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत दरमहा सव्वा लाख रुपये वेतन मिळेल, असे सांगितले. या आकर्षक पगाराच्या आमिषाला बळी पडून महिला दुबईला रवाना झाली. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर नोकरीचे आश्वासन फसवे असल्याचे स्पष्ट झाले.
दुबईत गेल्यानंतर संबंधित एजंटकडून तिच्यावर देहविक्री करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. महिलेने त्यास नकार दिल्यानंतर तिचा पासपोर्ट काढून घेण्यात आला आणि तिला एका खोलीत बंदिस्त करण्यात आले. तिच्या सुटकेच्या बदल्यात पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली.
या संकटातून महिलेची सुटका करण्यासाठी तिच्या पतीने पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मोहोळ यांनी स्वतः परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आणि दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाची मदत मागितली.
त्यानंतर संबंधित महिलेचे ठिकाण शोधून तिच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला. तिच्या सुटकेसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच भारतात परतण्यासाठी विमान तिकिटाची व्यवस्था करण्यात आली. या प्रयत्नांनंतर महिला मुंबईत दाखल झाली आणि सुखरूप मायदेशी परतली. या संपूर्ण सुटका मोहिमेत पुण्यातील राहुल तुळपुळे यांच्यासह श्वेता करंदीकर, प्रसाद दातार आणि प्रसाद पाटील यांनीही विशेष प्रयत्न केले.
दरम्यान, नोकरीचे आमिष दाखवून महिलांना परदेशात पाठवून त्यांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहे. परदेशात नोकरीसाठी जाण्यापूर्वी संबंधित एजंटची विश्वासार्हता आणि नोकरीशी संबंधित कागदपत्रांची योग्य पडताळणी करणे आवश्यक आहे. केवळ आकर्षक पगाराच्या आश्वासनावर विश्वास ठेवून परदेशात जाण्याचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.


