(दापोली / रत्नागिरी प्रतिनिधी)
फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या गंभीर गुन्ह्यात तब्बल सात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला दापोली पोलिसांनी अचूक गोपनीय माहितीच्या आधारे जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला स्थानिक पोलीस पाटील यांच्या सहकार्याने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला पुढील तपासासाठी कोपरखैरणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१६/२०१९ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), ४६४, ४६७, ४६८ (बनावट कागदपत्र तयार करणे) तसेच कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाम काशीनाथ सपकाळ हा दीर्घकाळापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता.
न्यायालयीन प्रक्रियेलाही आरोपी सातत्याने गैरहजर राहत असल्याने बेलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला फरार आरोपी म्हणून घोषित केले होते. त्यानंतर कोपरखैरणे पोलीस त्याचा शोध घेत होते; मात्र तो हाती लागत नव्हता.
दरम्यान, संबंधित आरोपी दापोली तालुक्यात वास्तव्यास असल्याची विश्वासार्ह गोपनीय माहिती दापोली पोलिसांना मिळाली. या माहितीची पडताळणी करून पोलिसांनी स्थानिक पोलीस पाटील यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध सापळा रचला आणि आरोपीला कोणताही अनुचित प्रकार न घडू देता ताब्यात घेतले.
अटकेनंतर आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून आरोपीला पुढील तपासासाठी कोपरखैरणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात दापोली पोलिसांना मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जात असून, या कारवाईमुळे गुन्हेगारांचा माग काढण्यातील स्थानिक पोलिसांची दक्षता आणि समन्वय पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या कारवाईचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

