(विशेष / प्रतिनिधी)
हिमालयातील प्रतिकूल हवामान, खडतर चढाई आणि क्षणाक्षणाला संयमाची परीक्षा घेणाऱ्या आव्हानांवर मात करत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील होमगार्ड जवान आकाश प्रमोद पालकर याने मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी माउंट फ्रेंडशिप शिखर सर केले. विशेष म्हणजे, ही हिमालयीन गिर्यारोहण मोहीम त्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठ कार्याला समर्पित केली होती. त्यामुळे शिखरावर फडकलेला विजयाचा झेंडा हा केवळ एका गिर्यारोहकाच्या यशाचा नव्हे, तर कर्तव्य, धैर्य आणि सेवाभावाला दिलेल्या सलामाचा साक्षीदार ठरला आहे.
‘Mt. Friendship Expedition 2026’ या मोहिमेच्या माध्यमातून पालकर याने रत्नागिरी पोलिसांच्या कार्याला अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्याचा संकल्प केला होता. हा संकल्प त्याने प्रत्यक्षात उतरवत माउंट फ्रेंडशिपच्या शिखरावर पाऊल ठेवले. हिमालयाच्या उंच शिखरावर पोहोचल्यानंतर त्याने केलेल्या व्हिडिओ संदेशातून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या कार्याचा विशेष गौरव केला आहे. ‘कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करत माउंट फ्रेंडशिप शिखरावर पोहोचलो,’ अशा भावना पालकर याने व्यक्त केल्या. रत्नागिरीमध्ये पोलीस दलाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून, कर्तव्यनिष्ठ पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कार्याला सलाम, असेही त्याने शिखरावरून नमूद केले आहे. त्यामुळे या मोहिमेला साहसासोबतच कृतज्ञतेची आणि कर्तव्यनिष्ठेला अभिवादन करण्याची भावनिक किनार लाभली आहे.
नागरिकांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दल अहोरात्र कार्यरत असते. या सेवाभावातून प्रेरणा घेत पालकर याने हिमालयातील कठीण मोहिमेसाठी शिस्त, धैर्य, संयम आणि चिकाटी हीच आपली शिदोरी मानली. प्रतिकूल परिस्थितीसमोर न झुकता शिखर गाठण्याचा त्यांचा निर्धार अखेर यशस्वी ठरला. या मोहिमेपूर्वी पालकर याने पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना निवेदन देत ही मोहीम रत्नागिरी पोलीस दलाला समर्पित करण्याचा संकल्प व्यक्त केला होता. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या सेवेला हिमालयाच्या शिखरावरून मानवंदना देण्याचा त्याचा हा संकल्प आता प्रत्यक्ष यशात परिवर्तित झाला आहे.
दरम्यान, मोहिमेसाठी निघण्यापूर्वी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी आकाश पालकर याला शुभेच्छा देत मोहिमेच्या यशस्वी आणि सुरक्षित वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर पालकर याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत माउंट फ्रेंडशिप सर करून आपल्या संकल्पाची पूर्तता केली. आकाश पालकर याचे हे यश रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. पोलीस दलाच्या कर्तव्याला हिमालयाच्या उंचीशी जोडणाऱ्या या मोहिमेतून आकाश याने ‘सेवा आणि साहस’ यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिखरावरून दिलेला हा सलाम त्यांच्या गिर्यारोहणाच्या यशाला वेगळीच उंची देणारा ठरला आहे.


