महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाची दुरुस्ती केली आहे. इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर आता सकाळच्या सत्राऐवजी दुपारच्या सत्रात घेण्यात येणार आहे. हा पेपर पूर्वनियोजित १७ फेब्रुवारी २०२७ रोजीच होणार असून, त्याची वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ६ अशी निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
मूळ वेळापत्रकानुसार अर्थशास्त्राची परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणार होती. मात्र, सुधारित वेळापत्रकात या परीक्षेचे सत्र बदलण्यात आले आहे. हा निर्णय कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमधील अर्थशास्त्र विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे. बारावीच्या अन्य विषयांच्या परीक्षांमध्ये किंवा दहावीच्या (SSC) कोणत्याही लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही.
फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वीच अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी २०२७ पासून, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
मंडळाने ६ नोव्हेंबर २०२६ पासून आपल्या अधिकृत संकेतस्थळावर विषयानुसार परीक्षांचे दिनांकनिहाय वेळापत्रक उपलब्ध करून दिले होते. त्यामध्ये आता बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या परीक्षेच्या वेळेत आणि सत्रात दुरुस्ती करण्यात आली आहे. या बदलाची माहिती सर्व संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी विभागीय मंडळांना देण्यात आली आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भात माहिती देताना विभागीय मंडळांनी स्थानिक पातळीवर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करावे आणि सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना सुधारित वेळापत्रकाची माहिती द्यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्याचे सांगितले.
दरम्यान, मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले वेळापत्रक हे माहितीसाठी असून, परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना पाठविण्यात येणारे मंडळाचे छापील वेळापत्रक अंतिम मानले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तारीख, सत्र आणि वेळ यांची खात्री संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून मिळणाऱ्या छापील वेळापत्रकातूनच करावी.
विविध संस्थांनी प्रसिद्ध केलेली वेळापत्रके, अनधिकृत संकेतस्थळांवरील माहिती तसेच व्हॉट्सॲप आणि अन्य सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या वेळापत्रकांच्या प्रतींवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.


