(मंडणगड/ रत्नागिरी प्रतिनिधी)
घरातून कोयती घेऊन बाहेर पडलेल्या दहा वर्षीय मुलाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंडणगड तालुक्यातील लाटवण येथे घडली. मयुर अनिल पवार (वय १०, रा. लाटवण आदिवासीवाडी, ता. मंडणगड) असे मृत मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजता मयुर घरातून कोयती घेऊन बाहेर गेला होता. मात्र, तो बराच वेळ घरी परतला नाही. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास त्याच्या कुटुंबीयांना मयुर घरी न आल्याचे समजले. त्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याचा परिसरात शोध सुरू केला. शोध घेत असताना रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास लाटवण हायस्कूलजवळील बांबूच्या बेटाशेजारी इलेक्ट्रिक सिमेंटच्या पोलजवळ मयुर उताण्या अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याच्या दोन्ही पायांना मुख्य वीजवाहिनीची तार चिकटलेली असल्याचे दिसून आले. विजेच्या धक्क्यामुळे त्याच्या दोन्ही पायांना भाजल्यासारख्या गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.
विजेच्या तारेला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागल्याने झालेल्या गंभीर दुखापतीत मयुरचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची नोंद मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १८/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.


