(साखरपा / दिपक कांबळे)
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे बाजारपेठेतील ब्रिटिश कालीन पुलाचा कठडा तोडून कोळसा वाहून नेणारा ट्रक थेट दुकानात घुसला. हा अपघात सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवीतहानी घडली नाही मात्र पुलाच्या कठड्या शेजारी असलेल्या राजेंद्र चिंगळे यांचे दुकान वाचले आहे.
या महामार्गावर नियमितपणे कोळशाची वाहतूक करणारे ट्रक जाता येता भरधाव वेगाने धावत असतात त्यामुळे जीवितहानी नाकारता येत नाही संबंधित यंत्रणेने याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे त्याशिवाय प्रमाणापेक्षा जास्त कोळसा वाहतूक होत असल्याने वेगावर नियंत्रण राहत नसल्याने वारंवार या ट्रकचे अपघात घडत आहेत. यापूर्वी याच पुलावरून एक कोळसा भरलेला ट्रक पुलाचा कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळला होता. तर अनेकवेळा कोळशाच्या ट्रकला या पुलावर अपघात झालेला आहे.
ब्रिटिशकालीन सुमारे १०० वर्षा पूर्वीचा हा पूल असल्याने आणि अरुंद असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधकाम विभागाने याची दखल घेतलेली दिसत नाही. बाजारपेठ आणि पुलाच्या दोन्ही बाजूस विजेच्या खांबावरील विजेचे बल्ब बंद असल्यामुळे देखील वाहनांना या पुलाचा अंदाज येत नसावा, असे म्हटले जात आहे. सोमवारी रात्री कोळसा वाहून नेणारा ट्रक पुलाचा कठडा तोडून थेट दुकानात घुसला. दुकानाच्या पुढील भागाला जोराचा दणका बसल्याने छप्पर हादरले आहे. दरम्यान, दाभोळे बाजारपेठेत वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

