(पुणे)
बॅंकांमधील नागरिकांचे पैसे लाटणे किंवा अवाजवी अमिषे दाखवित नागरिकांना फसविणारे सायबर भामटे कोणतीही नवी योजना आली की आपले जाळे फेकण्यात तरबेज झाले आहेत. अशाच आणखी एका जाळ्यात नागरिक फसत असून, हाय सिक्युरिटी नंबरप्लेटचा शासनाचा आदेश येताच त्यांनी बनावट वेबसाईट तयार करून नागरिकांना लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचे समोर आले आहे.
शासनाच्या आदेशानुसार जुन्या वाहनांना दि. ३० एप्रिलपर्यंत एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेणे बंधनकारक आहे. २०१९ पूर्वीची जवळपास २५ लाख वाहने असून, त्यांना आॅनलाइन अर्ज भरून शुल्क भरायचे आहे. ही बाब लक्षात घेत सायबर चोरटे सक्रीय झाले आहेत. बनावट वेबसाइट वरून सायबर चोरट्यांनी नागरिकांना जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
वाहन उत्पादक आणि कांही वाहतुक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे अशा फसवणुकीची प्रकरणे आली असल्याचे गुरुवारी आरटीओ कार्यालयात झालेल्या प्रशिक्षणा दरम्यान, अधिकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर असे प्रकार टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच नंबरप्लेट बदलण्याची प्रक्रिया करावी, असे आवाहन पुणे आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात दि. १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक आहे. २०१९ पूर्वीच्या जून्या वाहनांनाही परिवहन विभागाने ही नंबर प्लेट बंधनकारक केली आहे. यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी या एजन्सीकडून ६९ फिटमेंट सेंटरला परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या सेंटरमधून वाहनधारकांना नंबरप्लेट बसवून दिली जाणार आहे. परिवहन विभागाच्या transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यावर एचएसआरपी ऑनलाइन बुकिंग या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर संबंधित आरटीओ निवडून प्रक्रिया पूर्ण करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याची प्रक्रिया शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावी. या संकेतस्थळावरून प्रक्रिया केल्यानंतर नागरिकांना सर्व माहिती मिळू शकेल.