(दापोली)
तालुक्यातील हर्णै समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी एक डॉल्फिन मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत किनाऱ्यावर आलेल्या या डॉल्फिनला वाचविण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी जीवाचे रान करून प्रयत्न केले. मात्र, त्याच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि शेवटी डॉल्फिनचा मृत्यू झाला.
ही घटना समजताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने किनाऱ्यावर धावले. डॉल्फिन पाहण्यासाठी चांगलीच गर्दी उसळली होती. हर्णे समुद्रकिनाऱ्यावर यापूर्वीही डॉल्फिन मृतावस्थेत आढळल्याच्या घटना घडल्या असून, वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे समुद्री जीवांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक मच्छीमारांच्या मते, खोल समुद्रातील वाढती मासेमारी, समुद्रात वेगाने वाढणारी बोटींची संख्या, तसेच काही ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या जाळ्यांमुळे डॉल्फिनसह विविध समुद्री जीवांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे समुद्री जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मत्स्य विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डॉल्फिनची पाहणी करून मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी काही नमुने गोळा केले असून, ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वारंवार समुद्रकिनाऱ्यावर मृत डॉल्फिन आढळण्याच्या घटना सुरू राहिल्याने या समुद्री सजीवांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी आता मच्छीमारांकडून जोर धरत आहे.

