(संगमेश्वर / एजाज पटेल)
रेडिमेड कपड्यांच्या झगमगाटात आणि मॉल संस्कृतीच्या वाढत्या प्रभावातही टेलरकडून कपडे शिवून घेण्याची परंपरा अजूनही कायम टिकून आहे. बदलत्या फॅशन ट्रेंड्सच्या काळात टेलरिंग व्यवसायाने आपले स्वतंत्र अस्तित्व केवळ जपले नाही, तर अधिक सक्षमपणे उभे केले आहे. त्यामुळेच ग्राहकांचा आता बहुतेकांचा कल पुन्हा मापाच्या कपड्यांकडे वळताना दिसत आहे.
आज बाजारात रेडिमेड कपड्यांचे असंख्य पर्याय उपलब्ध असले तरी त्यांचे फिटिंग ठराविक साच्यांमध्येच मर्यादित असते. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असल्याने सर्वांनाच ते कपडे तितकेसे चपखल बसतात असे नाही. याउलट, टेलरकडून स्वतःच्या अचूक मापानुसार कपडे शिवून घेतल्यास मिळणारा आराम आणि आत्मविश्वास वेगळाच असतो. याच कारणामुळे तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील ग्राहक पुन्हा टेलरिंगकडे आकर्षित होत आहेत.
विशेषतः लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि खास प्रसंगी टेलरिंग व्यवसायाला मोठी मागणी असते. ग्राहकांना आपल्या आवडीनुसार गळ्याची रचना, बाह्यांचा प्रकार, खिशांची डिझाइन अशा प्रत्येक गोष्टीत हवे तसे बदल करता येतात. शिवाय, कापडाची निवडही स्वतःच्या पसंतीनुसार करता येत असल्याने कपड्याची गुणवत्ता आणि लूक अधिक समाधानकारक ठरतो.
आजचे टेलरही काळानुसार बदलले आहेत. मोबाईलवर दाखवलेले डिझाइन किंवा इंटरनेटवरील ट्रेंड्स अचूकपणे साकारण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे. त्यामुळे रेडिमेड कपड्यांच्या स्पर्धेत मागे पडण्याऐवजी टेलरिंग व्यवसाय अधिक आधुनिक आणि स्पर्धात्मक बनला आहे.
पर्फेक्ट फिटिंग, मापाच्या कपड्यांमुळे येणारा आत्मविश्वास आणि वैयक्तिक स्टाइल या तीन महत्त्वाच्या घटकांमुळे टेलरिंग व्यवसायाचे महत्त्व आणि ट्रेंड आजही कायम आहे. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत हा व्यवसाय नव्या उमेदीने पुढे जात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

