(संगमेश्वर / एजाज पटेल)
विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद झालेल्या डिंगणी (बागवाडी) येथील जिल्हा परिषद मालकीची असलेल्या मराठी शाळेची इमारतीची पार दुर्दशा झाली आहे. जाणीवपूर्वक दुर्लक्षित असलेल्या या इमारतीची वेळीच दुरुस्ती केली नाही तर ती इमारत केव्हाही जमीनदोस्त होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
सुमारे एक ते दोन वर्षांपूर्वी शून्य विध्यार्थी पटसंख्येमुळे पहिली ते सातवी वर्गा पर्यंतची असलेली शाळा बंद झाली. शाळा सुरु असेपर्यंत इमारतीच्या डागडुजीसाठी प्रशासनाकडून पाण्यासारखा पैसा खर्च केला जात होता. मात्र हीच शाळा कायमस्वरूपी बंद पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाला ही इमारत जिल्हा प्रशासनाची आहे याचाच विसर पडला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अवघ्या काही वर्षांपूर्वी अद्यापणाचे धडे गिरवण्यासाठी येणाऱ्या या लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजणारी सुशोभीत शाळा इमारत विध्यार्थ्यांविना ओस पडून बंद पडली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे इमारतीचा स्लॅब नादरुस्त होऊन गळती लागल्याने पावसाचे पाणी इमारतीच्या खोलीत जाऊन इमारतीचे दरवाजे, खिडक्या तुटून गेल्याने ही इमारत उघडी भगाड झाली आहे. त्यामुळे ही इमारत आता सरपटणारे विषारी सर्प आणि मुक्या जनावरांचे आश्रयस्थान बनले आहे.
जिल्हा प्रशासन मालकीच्या इमारतीकडे प्रशासन अधिकाऱ्यांच्या असलेल्या अक्षम्य दुर्लक्षपणा मुळे या इमारतीत असलेले पंखे, कपाटे, पेट्या, लाकडी खुर्च्या, टेबल, भांडी,पाण्याच्या टाक्या आदी किमती सामान सुरक्षितस्थळी हलवण्याची वा सरकार दरबारी जमा करण्याची तसदी न घेतल्याने लाखो रुपये किमतीच्या समानाचीही विल्हेवाट लागली आहे.
शालेय कागदपत्रांची विल्हेवाट
इमारतीच्या स्लॅब मधून पावसाचे पाणी इमारतीत येऊन कपाटे, आणि पत्र्याच्या पेट्या गंजून दुर्दशा झाल्याने आतील कागदपत्र भिजून गेल्याने नासाडी झाली असून यापूर्वी या शाळेत शिक्षण घेतलेल्यांना भविष्यात कागदपत्र मिळवण्यासाठी अडचण निर्माण होईल अशी भीती निर्माण झाली आहे.
उघडीभगाड इमारत, चोरांसाठी रान मोकळे
पावसाच्या पाण्यामुळे लाकडी दरवाजा खराब होऊन तुटून पडल्याने दरवाजाविना असलेल्या खोलीत असलेले किमती सामान पळवण्यास चोरांसाठी सोपे आहेत. तर आतील कागदोपत्री दपतर पळवून त्याचा गैरवापर सुद्धा केला जाऊ शकेल हे सुद्धा नाकारून चालणार नाही.अशी भीतीही या शालेत शिक्षण घेतलेल्यांच्या मनाला सतावत आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाचा सुस्त कारभार कारणीभूत
जिल्हा प्रशासनाने सुस्त कारभार न हाकता आपल्या अख्त्यारीत असलेली व अखेरची घटका मोजत असलेल्या ह्या इमारतीकडे व खास करून इमारतीत असलेल्या कागदोपत्री दपतर आणि शासन मालमत्तेची जतन करण्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे महत्वाचे आहे हे विसरून चालणार नाही.

