(कळझोंडी / किशोर पवार)
मानवी चंचल मनाला काबूत ठेवणे व सर्व विकारांना नष्ट करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या विपश्यना – ध्यान साधना प्रत्येक धम्म बंधू भगिनींनी आचरणात आणून आपले जीवन आनंदमय व कल्याणकारी बनवावे असे आवाहन श्रामणेर व बौद्धाचार्य आयु.संदीप जाधव यांनी केले आहे. रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सैतवडे परटवणे जयभीमवाडी येथील लुंबिनी बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास कार्यक्रमात विपश्यना साधना मानवाला गरज या विषयावर प्रवचन देताना ते बोलत होते.
यावेळी विचार मंचावर बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा अध्यक्ष -प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, सेक्रेटरी सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, रिपाइं तालुका अध्यक्ष – विलास कांबळे, प्रसिद्ध प्रमुख किशोर पवार, सैतवडे बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष – अनिलजी जाधव, यांचे समवेत सेक्रेटरी निलेश सावंत, उपाध्यक्ष शशिकांत सावंत,बौध्दाचार्य- राहूल जाधव, महिला मंडळ अध्यक्षा-दिपिका जाधव,दीप्ती सुर्वे संस्कार समितीचे मुख्य सचिव आयु. रविकांत पवार गुरुजी व सर्व धम्म बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रवचनकार आयु.संदीप जाधव यांनी सांगितले की, मानवी मनाला काबूत आणण्यासाठी भ.बुद्धांनी महान तपश्चर्या केली. अनापान सती – ध्यान साधना,मनाची एकाग्रता, बैठक व्यवस्था, प्रसन्न मन, आनंदी क्षण, श्वास घेणे – श्वास सोडणे, इ.बाबत प्रात्यक्षिके दाखवली व प्रवचन दिले. जीवन जगण्याची कला व जागृत मन आपले कुशल कर्म करुन शारीरिक व अंतर्गत मनाची शुद्धता निर्माण करुन आदर्श जीवन जगण्यासाठी त्यांनी विविध दाखले देत उपस्थितांना उत्तम प्रकारे संबोधित केले.
तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांनी बौद्धजन पंचायत समितीचे उपक्रम, कार्यालयीन दप्तराची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष – अनिल जाधव यांनी तालुका शाखेच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन आयु. रविकांत पवार गुरुजी यांनी केले. त्यानंतर स्थानिक सैतवडे शाखेच्या वतीने सर्व मान्यवर पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी त्रिशरण पंचशील धार्मिक पूजापाठ आयु. संदीप जाधव यांनी घेतला. शेवटी सर्वांचे आभार तालुका सेक्रेटरी सुहास कांबळे यांनी मानले. भोजन दान करुन वर्षावास कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.