(संगमेश्वर / एजाज पटेल)
राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना संगमेश्वर एसटी स्टॅंड समोरील एक अवाढव्य, पुरातन वृक्ष काळाच्या पडद्याआड गेला. साधा वृक्ष नव्हता तो. वर्षानुवर्षे हजारो पांढऱ्या बगळ्यांचे ते हक्काचे घर होते, त्यांचे विसाव्याचे, सुरक्षिततेचे आणि नात्यांचे ठिकाण होते.
रात्रीच्या वेळी त्या वृक्षावर बसलेले असंख्य पांढरे बगळे पाहिले की जणू एखाद्या कवीच्या कल्पनेतले दृश्य प्रत्यक्षात उतरावे तसे वाटायचे. संपूर्ण वृक्ष पांढऱ्या कापसाने मढविल्यासारखा दिसायचा. जवळून पाहिले तरी मोहक, आणि लांबून पाहिले तरी विस्मयकारक! महामार्गावरून जाणारे प्रवासी, वाहनचालक, एसटीने प्रवास करणारी जनता या दृश्याकडे नकळत आकर्षित होत असे. अनेकजण थांबून मोबाईल कॅमेऱ्यात ते क्षण टिपून पुढे जात.
मात्र विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात हा वृक्ष आडवा आला. नाईलाजाने कुऱ्हाडीचे घाव घालण्यात आले आणि एका क्षणात बगळ्यांचे वर्षानुवर्षांचे घर जमिनीवर कोसळले. त्या वेळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता.”या बिचाऱ्या बगळ्यांचे आता काय?”
दिवस मावळला, सूर्यास्त झाला आणि जणू काही काहीच घडले नाही अशा थाटात संध्याकाळ होताच हळूहळू बगळे नेहमीप्रमाणे आपल्या आश्रयस्थानी परतू लागले. मात्र समोर तो वृक्ष नव्हता… फक्त रिकामी जागा होती.
हजारो बगळे आकाशात घिरट्या घालू लागले. इकडे-तिकडे पाहू लागले. आपले घर शोधू लागले. हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाला चटका बसला. माणसाचे डोळे पाणावले, आणि मन सुन्न झाले.
क्षणभर असे वाटले की हे बगळे आता कुठेतरी दूर निघून जातील. पण नाही. जणू त्यांनी संगमेश्वर सोडून न जाण्याचा निर्णय घेतला होता. एसटी स्टॅंडच्या परिसराशी त्यांचे एक अदृश्य नाते जडले होते. म्हणूनच त्यांनी एसटी स्टॅंड समोरच्या देवरुख मार्गावरील वृक्षांवर, तसेच स्टॅंडच्या मागील भागातील झाडांवर नव्याने आश्रय घेतला.
आज पुन्हा संध्याकाळ झाली की तेच दृश्य दिसते. पुन्हा आकाश पांढऱ्या बगळ्यांनी भरते. पुन्हा झाडे शुभ्र दिसू लागतात. फरक एवढाच की आता ते एकाच वृक्षावर नाहीत, तर अनेक झाडांवर विभागले गेले आहेत.
ही घटना केवळ एका वृक्षाची किंवा बगळ्यांची कथा नाही. ती माणसाच्या विकासाच्या धावपळीतील संवेदनशीलतेची कथा आहे. निसर्गाशी असलेले आपले नाते किती नाजूक आहे, याची आठवण करून देणारी ही कहाणी आहे.विकास आवश्यक आहे, पण तो करताना निसर्गाचे आणि मुक्या जीवांचे अस्तित्व जपण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. कारण माणूस घर बदलू शकतो, पण पक्षी आपल्या घराशी मनाने बांधलेले असतात. संगमेश्वरच्या बगळ्यांनी हेच शिकवले आहे.घर पडले तरी आशा उरते, आणि निसर्ग कधीच हार मानत नाही.

