(रत्नागिरी / वार्ताहर)
कोकणचे निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक गडकिल्ले, समृद्ध संस्कृती आणि पर्यटनवैभव डिजिटल माध्यमातून देशभर पोहोचविणाऱ्या रत्नागिरीच्या पूर्वा प्रविण किणे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे आयोजित ‘भारत पर्व २०२६’ या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB), मुंबई यांच्यामार्फत राष्ट्रीय स्तरावर झालेली ही निवड रत्नागिरीसह संपूर्ण कोकणासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या ‘भटकंती बाय पूर्वा’ या इन्स्टाग्राम पेजनेही १० कोटींहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.
गुजरातमधील एकतानगर येथे ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ‘भारत पर्व २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात देशातील विविध राज्यांची संस्कृती, लोककला, परंपरा, हस्तकला आणि पर्यटनस्थळांचे वैभव प्रदर्शित करण्यात आले. देशभरातील निवडक डिजिटल कंटेंट क्रिएटर्समधून PIB मुंबईमार्फत पूर्वा किणे यांची निवड झाली. या माध्यमातून राष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक ओळख मांडण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली.
पूर्वा यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. रत्नागिरीतील जी.जी.पी.एस. आणि देवरुख येथील अरुंधती पाध्ये यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील रुपारेल आणि भवनस महाविद्यालयातून पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत VFX एडिटर म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले. मात्र, इतिहास, निसर्ग आणि भटकंतीची असलेली आवड त्यांना सातत्याने खुणावत होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांची भ्रमंती सुरू केल्यानंतर हळूहळू हाच त्यांच्या आवडीचा आणि कार्याचा मुख्य विषय बनला.
चित्रपटसृष्टीतील कारकीर्द मागे सोडून त्यांनी पूर्णवेळ पर्यटन आणि डिजिटल कंटेंट निर्मितीला प्राधान्य दिले. ‘भटकंती बाय पूर्वा’ या इन्स्टाग्राम पेजच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली. विशेषतः कोकणातील गडकिल्ले, समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती, स्थानिक परंपरा आणि ग्रामीण जीवनशैली यांचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन त्यांच्या व्हिडिओंमधून घडले.
त्यांच्या या उपक्रमाला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला. ‘भटकंती बाय पूर्वा’ या पेजला १० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळणे हे त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे. स्थानिक पर्यटनस्थळांना डिजिटल माध्यमातून व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याच्या त्यांच्या कार्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली आहे.
रत्नागिरीतून सुरू झालेला पूर्वा प्रविण किणे यांचा प्रवास भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचला आहे. चित्रपटसृष्टीतील अनुभव, इतिहासाविषयीची आवड, गड-किल्ल्यांची भटकंती आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर यांच्या माध्यमातून त्यांनी कोकणच्या पर्यटनवैभवाला नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या या निवडीमुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


