(संगमेश्वर /प्रतिनिधी)
दिवाळीच्या सुट्टीत मुले खेळण्यात दंग असताना, संगमेश्वर तालुक्यातील नावडी-भंडारवाडा येथील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या आईशा अमित मयेकर या चिमुकलीने मात्र आपला वेळ सृजनशील कामात सत्कारणी लावला आहे. शाळेत कार्यानुभव विषयात शिकलेल्या हस्तकौशल्याचा घरी सराव करत तिने मातीपासून विविध सुबक भांडी, हत्यारे आणि आकर्षक कलाकृती साकारल्या आहेत. तिच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोंड असुर्डे नं. १ शाळेत शिकणाऱ्या आईशाला शालेय अध्यापनातून कागदकाम, पुठ्ठाकाम, ठसेकाम, कोलाजकाम आणि मातीकाम यांसारख्या अनेक कलांचे प्राथमिक धडे मिळाले आहेत. सुट्टीत या ज्ञानाचा सराव केल्यास कामात सातत्य आणि सुबकता येईल, या विचाराने तिने मातीकामाचा हा घरगुती उपक्रम हाती घेतला. या कामात तिला तिची आई आर्या मयेकर आणि बहिणीची मोलाची साथ लाभली. केवळ अभ्यासातच नव्हे, तर इतर कलागुणांमध्येही आईशा नेहमीच आघाडीवर असते. तिला चित्रकला आणि बॅडमिंटनची विशेष आवड आहे. तसेच, नावडी येथील ‘अमृता ग्रुप’च्या माध्यमातून ती गेल्या तीन-चार वर्षांपासून मंगळागौरीचे पारंपरिक खेळ आणि फुगडीचे विविध प्रकार मोठ्या उत्साहाने सादर करत आहे. ग्रुपच्या प्रमुख अर्चिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने लहान वयातच या कलेत नैपुण्य मिळवले असून, तिच्या सादरीकरणाला रसिकांची नेहमीच दाद मिळते.
आईशाच्या या अष्टपैलू कामगिरीची आणि कलेची दखल घेत जागतिक विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून तिचा गौरव करण्यात आला. नावडी येथील सामाजिक कार्यकर्ते विनय मुरकर तसेच शिक्षण व पुस्तकप्रेमी दिनेश अंब्रे यांनी आईशाच्या घरी जाऊन तिला शैक्षणिक साहित्य आणि भेटवस्तू देऊन तिचे कौतुक केले. या सन्मानामुळे तिला भविष्यात अधिक कठीण व दर्जेदार कलाकृती घडवण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे.


