(रत्नागिरी)
शहराजवळील चर्मालय ते विमानतळ रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर किर्तीनगर स्टॉपजवळ एका पिकअप टेम्पोने अचानक वळण घेतल्याने दुचाकीस्वार व त्याचा साथीदार जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर अज्ञात टेम्पो चालकाविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीपकुमार चुन्नीलाल भारती (वय २६, रा. डिमार्टजवळ, एमआयडीसी मिरजोळे, ता. जि. रत्नागिरी, मुळ रा. रानीनगर, खेरी, उत्तर प्रदेश) हे त्यांच्या ताब्यातील अॅक्सेस मोटारसायकल (क्र. MH-08-AY-7377) वरून साथीदार रविकिशन उमाशंकर निसाद याला मागील सीटवर बसवून चर्मालयहून विमानतळाकडे जात होते.
२७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३५ वाजताच्या सुमारास, किर्तीनगर स्टॉपजवळ रस्त्यावर असताना, समोरून येणाऱ्या पिकअप टेम्पो चालकाने अचानक किर्तीनगर कदमवाडी रस्त्याकडे वळण घेतले. त्यामुळे टेम्पोची जोरदार धडक दुचाकीला बसली. या धडकेत फिर्यादी प्रदीपकुमार भारती आणि रविकिशन निसाद रस्त्यावर पडले व गंभीर जखमी झाले. फिर्यादीच्या कपाळाला आणि उजव्या हाताला मार लागला असून दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
या घटनेप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १८४, १३४(ब)/१७७ अंतर्गत अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.