( रत्नागिरी )
रत्नागिरीत पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील तायक्वॉंडो ब्लॅक बेल्ट परीक्षेत गणराज तायक्वॉंडो क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. दूर्वा मंदार हातीसकर, अनया अभिज्ञ वणजू आणि अहाना आशिष रसाळ यांनी ‘ब्लॅक बेल्ट प्रथम दान’ परीक्षेत यश मिळवत जिल्ह्याचा मान उंचावला.
Taekwondo Federation of India यांच्या मान्यतेने तसेच Taekwondo Association of Maharashtra यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २९ मार्च २०२६ रोजी ‘ब्लॅक बेल्ट दान प्रमोशन टेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा मारुती मंदिर येथील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडली.
अखिल भारतीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेसाठी देशभरातून 500 हून अधिक खेळाडू रत्नागिरीत दाखल झाले होते. खेळाडूंच्या तांत्रिक कौशल्याबरोबरच शारीरिक क्षमतेची कठोर चाचणी या परीक्षेत घेण्यात आली.
रत्नागिरीतील साळवी स्टॉप परिसरातील गणराज तायक्वॉंडो क्लबचे एकूण तीन खेळाडू या महत्त्वाच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. तिघांनीही उत्कृष्ट कामगिरी करत ‘प्रथम दान’ स्तर यशस्वीरित्या पूर्ण केला. या खेळाडूंना महिला प्रमुख प्रशिक्षक आराध्या प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांसह विविध मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आणि स्थानिक पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.
गणराज तायक्वॉंडो क्लबच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात अधिक खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे.
फोटो कॅप्शन:
रत्नागिरीतील राष्ट्रीय ब्लॅक बेल्ट परीक्षेत यशस्वी ठरलेले गणराज तायक्वॉंडो क्लबचे खेळाडू दूर्वा, अनया, आहाना यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील आणि प्रशिक्षक आराध्या मकवाना.

