(राजापूर / रत्नागिरी)
पाचल येथे जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेले ४० वर्षीय रामचंद्र शांताराम कुंडेकर हे परतताना गावातील रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, रायपाटण येथे दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. ही घटना २ ऑक्टोबर रोजी घडली. रामचंद्र शांताराम कुंडेकर (४०, रा. करक-आंबा, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रामचंद्र कुंडेकर यांना दारूचे व्यसन असल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे.
२ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता ते पाचल येथे जाण्यासाठी घरातून निघाले होते. दुपारी सुमारे २ वाजता ते करक गावाकडे परतत असताना गावातील रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर अशोक सिताराम कुंडेकर यांनी त्यांना घरी आणले. मात्र, रामचंद्र हे बोलतचालत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०४ वाजता त्यांना मृत घोषित केले, अशी नोंद आहे.
या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६१/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी व पोलिसांच्या पुढील कार्यवाहीत स्पष्ट होणार आहे.


