(रत्नागिरी / वार्ताहर)
मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा नजीक निवळी-बावनदी उतार येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ५२ वर्षीय चालक जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थेची हातखंबा येथे २४ तास कार्यरत असलेली मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय गोविंद रांबाडे (वय ५२, रा. संगमेश्वर, वांगणी) हे दुचाकी क्रमांक MH 08 AH 5010 वरून रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जात होते. दुपारी तीनच्या सुमारास निवळी-बावनदी उतार येथे त्यांची दुचाकी घसरल्याने अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थेची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली.
रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी जखमी धनंजय रांबाडे यांना प्राथमिक मदत केली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातानंतर वेळेत उपलब्ध झालेल्या मोफत रुग्णवाहिका सेवेने जखमीला तातडीने वैद्यकीय मदत आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.


