(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
विक्रीसाठी गावठी हातभट्टीची दारू साठवून ठेवणाऱ्या एकासह सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत आढळलेल्या चौघांविरोधात रत्नागिरी आणि राजापूर पोलिसांनी कारवाई केली. या दोन्ही घटनांमध्ये पाच जणांविरोधात दारूबंदी कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी-ओरी मार्गालगतच्या जंगलमय परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी सुरेश बाळू गोताड (५०, रा. चाफे, मधलीवाडी, जाकादेवी) याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२.१७ वाजता ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल भैरवनाथ सवाईराम यांच्या तक्रारीनुसार, गोताड याच्याकडे २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू, अंदाजे २ हजार ७०५ रुपये किमतीची, विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली आढळली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान, राजापूर तालुक्यातील खरवते येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत आढळलेल्या चौघांवर राजापूर पोलिसांनी कारवाई केली. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास महामार्गालगत काही व्यक्ती मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चौघांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल केले.
या कारवाईत अमर भगवान साळुंके (४७), सागर विजय गवळी (३६), रोशन पोपट गायकवाड (२५) आणि संतोष पुंडलिक पानसरे (४७) यांचा समावेश आहे. चौघेही बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संबंधितांवर अनुक्रमे रात्री ८.५५, ९.१७, ९.३८ आणि ९.५५ वाजता गुन्हे दाखल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत आढळल्याप्रकरणी दारूबंदी कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली.


