(रत्नागिरी /प्रतिनिधी)
दारूच्या नशेत पाय घसरून पडल्याने गंभीर दुखापत झालेल्या ४७ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. संजीव बाळकृष्ण तारवे (४७, रा. तारवेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास संजीव तारवे हे राहत्या घराशेजारी दारूच्या नशेत असताना पाय घसरून पडले. त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी निवळी येथील डॉ. महाजन यांच्याकडे नेण्यात आले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी त्यांचा त्रास वाढू लागल्याने त्यांना रत्नागिरीतील चिराय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना २६ सप्टेंबर रोजी रात्री १०.१५ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजीव तारवे यांना मृत घोषित केले, अशी माहिती पोलिस नोंदीत नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक ९०/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. या घटनेची नोंद २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१६ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.


