(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गेल्या तीन दशकांपासून कोकणात सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणारे मारुती काका जोशी यांनी रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे बापट कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली. अंधश्रद्धा आणि गुलामगिरीच्या मानसिकतेविरोधात जनजागृती करत विवेक, विज्ञानवादी दृष्टिकोन आणि चिकित्सक विचार समाजात रुजविण्याच्या कार्यासाठी जोशी परिचित आहेत.
समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यानंद बापट यांच्या मूळ गावी त्यांच्या निवासस्थानी जोशी यांनी भेट देऊन त्यांचे आई-वडील श्री. सुहास बापट यांच्याशी संवाद साधला. यावेळी विद्यानंद बापट यांच्या सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्याबाबत चर्चा करून त्यांच्या कार्याचे अभिनंदन करण्यात आले. बदलत्या सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर समाजाने परिवर्तनशील विचार स्वीकारण्याची गरज असल्याचे यावेळी चर्चेत अधोरेखित करण्यात आले. नव्या विचारांचा, नव्या मूल्यांचा आणि विवेकवादी दृष्टिकोनाचा समाज घडविण्यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
भेटीदरम्यान परस्परांना पुस्तके भेट देत विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. सत्यशोधन, सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तनाच्या कार्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी भविष्यातील उपक्रमांबाबतही चर्चा झाली. या वेळी शिवप्रवर्तक हरिश्चंद्र गोरिवले आणि दीपक जोग उपस्थित होते.


